Taj Mahal Gets Hoax Bomb Threat : आग्रा : जग प्रसिद्ध असलेल्या ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ताज येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली आहे. आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत.
एसीपी ताज सिक्योरिटी सईद अरीब अहमद यांनी पीटीआयला माहिती देताना यासंदर्भात सांगितले की, पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता. त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही तपास सुरू आहे. ईमेलनुसार अद्याप असे कोणतेही इनपुट मिळालेले नाही. मात्र, सुरक्षा लक्षात घेऊन बॉम्ब निकामी पथक, शोध श्वान आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दुसरीकडे, उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे, त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता ताजमहालाला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली, याचा तपास सुरू आहे, असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.