दिल्ली एनसीआरमधील जवळपास 100 शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी आज (बुधवार) एका इमेलच्या माध्यमाने मिळाली. यानंतर अनेक शाळांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या धमकीनंतर, अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांचे पथकही, ज्या शाळांना इमेल आला त्या शाळांमध्ये पोहोचले. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर दिल्ली सरकारने शाळांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
दिल्ली सरकारची अॅडव्हायजरी... -- शाळा व्यवस्थापन/व्यवस्थापक/सरकारी शाळांचे मुख्य अधिकारी यांनी ईमेल आयडी आणि मेसेज शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळा सुरू असताना आणि नंतरही अवश्य चेक करावा.- कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा साहित्य दिसल्यास तत्काळ संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी आणि दिल्ली पोलिसांना माहिती द्यावी.- विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत, शाळा व्यवस्थापनाने कुटुंबातील सदस्य आणि संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी त्वरित संपर्क साधावा.
दिल्ली पोलिसांना मिळाले 143 कॉल -दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शाळांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीशी संबंधित 143 कॉल आले होते. मात्र, गाझियाबाद आणि नोएडातील शाळांना मिळालेल्या धमकीशी संबंधित किती कॉल पोलिसांना मिळाले, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना मिळताच सर्व शाळांमध्ये श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक पाठवून तपासणी करण्यात आली. तेथे कसल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये.
गुन्हेगारांना सोडणार नाही - यासंदर्भात बोलताना, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना म्हटले, शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मी जनतेला विश्वास देतो की, दिल्ली पोलीस पूर्णपणे तयार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. गुन्हेगारांना सोडणार नाही.