लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या घटनात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, गेल्या आठवडाभरात ७० विमानांत बाॅम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली. त्यापैकी ३० विमानांबाबत धमकी गेल्या २४ तासांत धमकी प्राप्त झाली. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या. मात्र, ३० पेक्षा जास्त विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले असून धमक्यांच्या प्रकारामुळे सुमारे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी धमकी प्राप्त होणाऱ्या कंपन्यांत एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअर या विमान कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी सहा विमानांचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बहुतांश धमक्या या सोशल मीडियावरून देण्यात आल्या आहेत. यापैकी काही प्रकरणांत आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
बीसीएएसची बैठक
नवी दिल्ली: विमानांत बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) शनिवारी विमान वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. काही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जातीने बैठकीला हजर होते. बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितले की, भारतीय आकाश पूर्णत: सुरक्षित आहे. सध्याचा प्रोटोकॉल मजबूत असून काटेकाेरपणे अमलात आणला जात आहे.