Bomb threat : बंगळूरू येथील तब्बल १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-मेलच्या माध्यमातून या शाळांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ सुरू झाली. या शाळांच्या अधिकृत ई-मेल साईटवर हा मेसेज आल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसवेश्वरनगरमधील नेपेल आणि विद्याशिल्पासह सात शाळांना तसेच येलहंका परिसरातील इतर खासगी शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर शाळांकडून पोलिसांना तात्काळ संपर्क करण्यात आला. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या घरानजीक असलेल्या एका शाळेचा देखील यात समावेश आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणा आणि बॉम्बशोधक पथक या शाळांमध्ये तपास चालु असल्याचे कळते आहे. एकाचवेळी १५ शाळांना आलेले ई-मेल फेक तर नाही ना याचादेखील पोलिसांकडून तपास सुरू आहे. साधरणत: सकाळच्या दरम्यान या शाळांना ई-मेल आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. धमकीचा मेल आल्यानंतर शाळेतील विद्यार्थी ,कर्मचारी तसेच विद्यार्थांना सुखरुप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.