नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुक बॉम्बे बार असोसिशनने रुचले नाही. मिश्रा यांनी पंतप्रधान मोदींवर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळी होती. त्यांच्या या कृतीवर नाराज झालेल्या असोसिएशनने मिश्रा यांच्या निंदेचा ठराव संमत केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कार्यपालिकेच्या प्रमुखांची अशा प्रकारे प्रशंसा करणे हाजीहाजी केल्याप्रमाणे आहे. या प्रशंसेची बार असोसिएशन निंदा करते. तसेच ही कृती अनुचित आणि बेजबाबदारपणाची होती, असं प्रस्तावत म्हटले आहे. हा प्रस्ताव गुरुवारी बार असोसिएशनच्या बैठकीत संमत करण्यात आला होता.
न्यायालयात सर्वात मोठ्या वाद्यांपैकी भारत सरकार एक आहे. त्यामुळे न्यायमंडळाने कार्यपालिकेच्या सदस्यासोबत निष्पक्ष असावे. मग ते कोर्टात असो वा बाहेर. अशा प्रकारचे वक्तव्य कायदेविषयक काम करणाऱ्यांचा आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास कमी करणारे असल्याचे असोसिएशनच्या प्रस्तावात म्हटले आहे.
न्यायमूर्ती मिश्रा यांनी केलेले वक्तव्य निराशाजनक आहे. तेही एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात असं वक्तव्य करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कॅबिनेटमंत्री, कायदेमंत्री आणि आंतरराष्ट्रीय कायदा समूह आणि सर्वोच्च न्यायालयाचे आजी आणि माजी न्यायधीश उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्त्वाची छाप पाडणारे नरेंद्र मोदी दूरदृष्टी असणारे व्यक्ती असल्याचे न्यायमूर्ती मिश्रा यांनी म्हटले होते. त्यांच्या नेतृत्वात भारत जगात जबाबदार आणि मैत्रीपूर्ण दृष्टीकोन असणार देश म्हणून समोर आला असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर याआधी बार असोसिएशन ऑफ इंडियाने देखील नाराजी व्यक्त केली होती.