लखनऊ, दि. 10- अमेठीच्या अकबरगंज रेल्वे स्टेशनवर कोलकाता-अमृतसर अकालतख्त एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात बॉम्ब असल्याच्या माहितीने सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यामुळे ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होतं. कमी तीव्रतेचा हा बॉम्ब पथकाकडून निकामी करण्यात आला आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस सहा तास थांबवून एक्सप्रेसची संपूर्ण तपासणी करण्यात आली. अमेठी पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने एक्सप्रेसची कसून तपासणी करून बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेतली. तसंच तपास पथकाला एक्स्प्रेसमधून बॉम्बसह एक पत्रही सापडलं आहे. त्या पत्रात अबू दुजानाला मारल्याचा बदला घेण्यात येइल अशी धमकी दिली आहे. अमेठीच्या एसपींनी दिलेल्या माहितीनूसार,12318 कोलकाता-अमृतसर डाउन एक्स्प्रेसच्या AC-B3 या बोगीमध्ये विस्फोटकं सदृश्य वस्तू सापडली. अबू दुजानाचा पत्रात उल्लेख असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले. ही गोष्ट कोणीतरी मस्तीमध्ये केलेली असू शकते. पण याचा कसून तपास केला जातो आहे.
मध्यरात्री सव्वा एक वाजता कोलकाता ते अमृतसरला जाणाऱ्या अकालतख्त एक्सप्रेसमध्ये (१२३१७) बॉम्ब असल्याची असल्याची खबर रेल्वे प्रशासनाला मिळाली. ही माहिती मिळताच तात्काळ अकालतख्त एक्सप्रेस रिकामी करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या शोधमोहिमेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यानंतर अमेठी पोलिसांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पण बॉम्बशोधक पथक मात्र पहाटे ४ च्या सुमारास दाखल झालं.
अकबरगंज स्थानकावर अकालतख्त एक्स्प्रेसच्या बी ३ कोचच्या स्वच्छतागृहात बॉम्बसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली. बॉम्बनाशक पथकाने ती वस्तू आपल्या ताब्यात घेतली आहे. ही कारवाई करताना दोन डबे रिकामे करण्यात आले होते, अशी माहिती लखनऊ विभागाचे आरपीएफ कमांडंट सत्यप्रकाश यांनी दिली. परंतु, ही संशयित वस्तू नेमकी काय आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी तपास केला जात आहे. रेल्वेची तपासणी केल्यानंतर ती रवाना करण्यात आली. यामुळे अकालतख्त रेल्वेला सुमारे ६ तास उशीर झाला.