नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांचा आकडा 69 लाखांवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल एक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच काहींनी आपल्या कुटुंबीयांचे अस्थी घेण्यासाठी देखील नकार दिला आहे.
कोरोनाची लागण होईल या भीतीने कुटुंबीय कोरोनाग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत आहेत. अशावेळी प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तसेच नातेवाईक अस्थी घेण्यासाठी देखील स्मशानभूमीत येत नाहीत. गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 900 लोकांच्या अस्थी अद्यापही स्मशानभूमीत पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अस्थिंचा ढीग लागला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये 450 आणि भरूचमध्ये 200 कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच आले नाही.
स्मशानभूमीत अस्थिंचा ढीग
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय आणि प्रशासनाच्या वतीने अशा लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच नवसारीमध्ये 222, अंकलेश्वरमध्ये 210 आणि जामनगरमध्ये 160 मृतकांची अस्थी घेण्यासाठी कोणी आलेलं नाही. सुरेंद्रनगर येथील स्मशानभूमीत अस्थिंचा ढीग लागला आहे कोरोनाच्या भीतीने नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. अनेक ठिकाणी तर या अस्थी डम्पिंग ग्राऊंडवर फेकण्यात येत आहे.
अस्थी घेण्यासाठी कुटुंबीयांचा नकार
जामनगरमध्ये स्मशान समितीचे सदस्य दर्शन ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनगरमधील स्मशानभूमीत 387 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यापैकी 80 टक्क्यांहून जास्त मृतकांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी आले नाही. याशिवाय अहमदबादमध्ये आतापर्यंत 1812 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यामध्ये 450 मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आले नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर त्याच्या शरीरातील कोरोनाचे अंश पूर्णपणे नाहीसे होतात. अशात अस्थी आणि राखेपासून भीती नाही. मात्र असे असतानाही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.