नवी दिल्ली : रेल्वेच्या ११.५८ लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना वित्त वर्ष २०१९-२० मधील ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळणार आहे, असे रेल्वेने गुरूवारी जाहीर केले. रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधरित एकूण बोनस २०८१.६८ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२०साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. बोनससाठी पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन आकलन सीमा ७,००० रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या निवेदनानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांसाठी अधिकतम १७,९५१ बोनस मिळू शकेल. या निर्णयाचा रेल्वेच्या सुमारे ११.५८ लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. रेल्वेच्या उत्पादकता आधारित बोनसमध्ये (पीएलबी) सर्व अराजपत्रित कर्मचारी (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) समाविष्ट आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्यापूर्वी पीएलबी मिळतो. यंदाही मंत्रिमंडळाच्या निर्णयाने दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुटीपूर्वी मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रेरित व्हावे, या अपेक्षेने हा निर्णय घेतला जातो, असेही रेल्वेने म्हटले आहे.