ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 18 - पंजाब सरकारने राज्यातील विविध शाळांमध्ये बुक बॅंकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्याची गरज पडणार नाही. तसेच, पुस्तकं खराब होण्यापासून वाचतील.
पंजाबच्या शिक्षणमंत्री अरुणा चौधरी यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचविण्याच्या दृष्टीकोणातून शिक्षण विभागामार्फत राज्यातील विविध शाळांमधून बुक बॅंकाची स्थापना करण्यात येणार आहे. वाचून झालेली पुस्तके किंवा जी पुस्तके वापर झाल्यानंतर रद्दी म्हणून वापरण्यात येणार आहेत, अशी पुस्तके या बुक बॅंकेत विद्यार्थ्यांना जमा करण्यास सांगण्यात येणार आहे. याचा फायदा गरजू विद्यार्थ्यांना होणार असून त्यांना ही पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत.
दरम्यान, याआधीपासून देशातील अनेक सरकारी शाळांमधून बुक बॅंक सारख्या योजना राबविण्यात येत आहेत. तर पंजाबमध्ये ही पहिलीच सुरुवात असल्याचे समजते.