MPचे मुख्यमंत्री होणार? 'जवाहर' पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात कैलाश विजयवर्गीय यांनी स्पष्टचं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:35 PM2023-12-04T19:35:41+5:302023-12-04T19:36:48+5:30
Book launch Jawahar based on senior freedom fighter Jawaharlal Darda : श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी दिल्लीत पार पडला.
नवी दिल्ली : लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि राजकीय-सामाजिक नेते श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी दिल्लीत पार पडला. यावेळी विविध पक्षातील राजकीय मंडळीची उपस्थिती होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विजयवर्गीय यांना केला असता त्यांनी मिश्किलपणे उत्तर देताना म्हटले, "मी दिवसा विनोद करत नाही." मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने सत्ता कायम राखली.
मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण?
मध्य प्रदेशात भाजपाला २३० पैकी १६३ जागा जिंकता आल्या, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. खरं तर यंदा तिकिट वाटपावेळी भाजपाने पक्षाचा राज्यातील चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, कैलाश विजयवर्गीय, नरेंद्र तोमर आणि प्रल्हाद पटेल यांची देखील नावं चर्चेत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर १ या विधानसभा मतदारसंघातून विजयवर्गीय यांनी काँग्रेसच्या संजय शुक्ला यांचा ५७,९३९ मतांनी दारूण पराभव केला.
दरम्यान, श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी जीवनातील विविध पैलूंवर आधारित 'जवाहर' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जम्मूचे माजी मुख्यमंत्री आणि काश्मीर लोकशाही पुरोगामी आझाद पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आझाद, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री आलोक मेहता आदी नेते उपस्थित होते.
जवाहर' पुस्तकाचा लोकार्पण सोहळा
'जवाहर' या पुस्तकातून जवाहरलाल दर्डा, कट्टर गांधीवादी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, गरिबांचे कल्याण आणि दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले, त्यांच्या कष्टाळू जीवनातील विविध पैलूंचा तपशील दिला आहे, जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, याचा आलेख या पुस्तकातून रेखाटला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होण्यापर्यंतच्या अनेक बाबी, संघर्ष आणि नैतिक मूल्यांनी भरलेला जवाहरलाल दर्डा यांचा जीवनप्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. श्री जवाहरलाल दर्डा यांच्यासारखी व्यक्ती शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येते. त्यांचे संपूर्ण जीवन समाज आणि देशासाठी प्रेरणादायी होते. त्यांनी अप्रतिम धैर्य, नेतृत्व, कौशल्य आणि नैतिक मूल्यांसह भारताला महान बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आणि कृती सर्वांना नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील.