अयोध्या : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना श्री तुलसीदास यांच्या रामायणाचे पुस्तक देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचेही स्वागत नीलम गोऱ्हे यांनी केले.
दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, या ठिकाणी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, भाजपा आणि हिंदुत्व वेगळे आहे. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपाला सोडले आहे हिंदुत्व नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. तसेच महाराष्ट्रातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालत आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी, उद्धव ठाकरेंची घोषणा
आम्ही भाजपापासून वेगळे झालो, पण...; उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून 'रामबाण'