अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य-दिव्य मंदिराची जोरदार तयारी सुरू आहे. या मंदिराचे आत्तापर्यंत ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले असून जलद गतीने हे काम पूर्ण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कामाचे भूमीपूजन केले असून आता मंदिराचे लोकार्पण कधी होणार याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देताना, राम मंदिराचं वचन आम्ही पूर्ण केलं असून आता भाविकांनी तिकीट काढून ठेवावं, असे म्हणत अमित शहांनी मुहूर्तच सांगून टाकला.
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे बांधकाम जोमाने सुरू आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये नूतन गर्भगृहात श्रीरामांची स्थापना होईल, अशी माहिती यापूर्वी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली होती. भगवान श्रीराम सर्वांचे आहेत, त्यामुळे कुणीही त्यांचे दर्शन घेऊ शकतो. मात्र, त्यात राजकीय हेतूऐवजी श्रद्धाभाव असावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती. आता, अमित शहांनीही हाच मुहूर्त जाहीर केला आहे. जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचे लोकार्पण होईल, त्यासाठी सर्वांनी तिकीट काढावे, असे अमित शहा म्हणाले. म्हणजेच, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ३ महिने अगोदरच अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होऊन जिर्णोद्धार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी अमित शहांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये, अमित शहा हे राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्तच सांगताना दिसून येतात.
कामाच्या गुणवत्तेवर ट्रस्ट समाधानी
दरम्यान, मुख्य मंदिराचे ४० टक्के आणि एकूण परिसराचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारणीतील प्रगती आणि गुणवत्ता याबाबत ट्रस्टकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. मंदिराचा तळमजला डिसेंबर २०२३ पर्यंत तयार होईल. त्यानंतर १४ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल.
१,८०० कोटींचा खर्च
मंदिर उभारणीसाठी १८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिर परिसरात प्रमुख साधू, संत यांच्या मूर्तींसाठी जागा तयार करण्यात येईल. या योजनेंतर्गत मंदिर परिसरात ७० एकर भागात वाल्मिकी, केवट, शबरी, जटायू, सीता, विघ्नेश्वर आणि शेषावतार (लक्ष्मण) यांची मंदिरेही उभारण्यात येणार आहेत. राजस्थानातील मकराना येथून पांढरे संगमरवर आणले जात असून मंदिराच्या गर्भगृहात त्यांचा उपयोग केला जाईल.