नवी दिल्ली : नियमितपणे रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. प्रवासी आता महिन्याकाठी दुप्पट तिकिटांचे बुकिंग (आरक्षण) करू शकणार आहेत. ज्या आयआरसीटीसी ॲप वापरकर्त्याचे लॉग-इन आयडी आधारशी लिंक नाही त्यांना ६ ऐवजी १२ तिकिटे काढता येतील, तर आधार लिंक असणाऱ्या ग्राहकांना १२ ऐवजी २४ तिकिटांचे बुकिंग करता येणार आहेत, अशी घोषणा रेल्वेने सोमवारी केली. आधार लिंक नसलेल्यांना महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करण्याची मर्यादा १२ तिकिटांपर्यंत वाढविली आहे.
आयआरसीटीसीच्या नियमांत बदल- एका महिन्यात जास्तीत जास्त १२ तिकिटे बुक करण्याची मर्यादा २४ तिकिटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यात आधार लिंक असणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
असे करा आधार लिंक
- आयआयसीटीसीच्या अधिकृत ई-तिकीट संकेतस्थळ irctc.co.in येथे भेट द्या.- लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाका.- होम पेजवरील माय अकाउंट सेक्शनमधील ‘आधार केवायसी’वर क्लिक करा.- आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.- आधार कार्डसोबत जो नोंदणीकृत क्रमांक आहे त्यावर ओटीपी येईल.- ओटीपी एंटर केल्यानंतर आधारशी संबंधित तपशील पाहिल्यानंतर, व्हेरीफायवर क्लिक करा.- त्यानंतर तुमच्या मोबाइलवर केवायसी तपशील यशस्वीरीत्या अपडेट केल्याचा संदेश येईल.