नवी दिल्ली :
देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने केली. दक्षता मात्रा खासगी लसीकरण केंद्रातही उपलब्ध हाेणार आहे. लसीचा दुसरा डाेस घेउन नऊ महिने झालेल्यांना दक्षता मात्रा घेता येईल. सर्व खासगी केंद्रांमध्ये ही सुविधा असेल. केंद्रीय आराेग्य मंत्री मनसुख मांडिविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. लसीच्या आतापर्यंत १८५.३८ मात्रा देण्यात आल्या आहेत.
१५ वर्षांवरील ९६ टक्के लाेकांना लसीची पहिली, तर ८३ टक्के लाेकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. २.४ काेटींहून अधिक आराेग्य व फ्रंटलाईन कर्मचारी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना दक्षता मात्रा दिली आहे. १२ ते १४ वयाेगटातील ४५ टक्के मुलांना पहिली मात्रा टाेचण्यात आली आहे.
माेजावे लागणार पैसे- सध्या सर्व पात्र नागरिकांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा सरकारी केंद्रांद्वारे देण्याची माेहीम सुरूच राहील. तसेच आराेग्य व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही दक्षता मात्राही सरकारी केंद्रांमधून देण्यात येईल. मात्र, १८ ते ५९ या वयाेगटातील नागरिकांना दक्षता मात्रा नि:शुल्क मिळणार नाही.
- काेविशील्डसाठी ६०० रुपये तर काेवाेवॅक्ससाठी ९०० रुपये अधिक कर, असे शुल्क मोजावे लागेल. कोवॅक्सिनच्या दक्षता मात्रेची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.