ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १२ - १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी निधन झाले. रतन सिंह यांनी पंजाबच्या टिब्बा येथे आपला अखेरचा श्वास घेतला. पैतृक या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या नातवाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या निधनाबद्दल धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. विशेष म्हणजे 'बॉर्डर' या गाजलेल्या चित्रपटात सुभेदार रतन सिंह यांच्यावर आधारीत एक व्यक्तिरेखाही साकारण्यात आली होती. अभिनेता पुनित इस्सार यांनी त्यांची भूमिका केली होती.
२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली व त्यानंतर पाकिस्तान व भारतादरम्यान मोठे युद्ध झाले. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. त्यांनतर भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धादरम्यान सुभेदार रतन सिंह यांनी राजस्थानच्या लोंगेवाला येथील सीमेवर तीव्र लढा देत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले.
अवघ्या काही भारतीय सैनिकांनी २ हजारपेक्षाही अधिक पाकिस्तानी जवानांशी लढा देत त्यांच्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला.
सुभेदार सिंग यांच्या युद्धातील अतुलनीय शौर्य व कामगिरीसाठी त्यांना 'वीरचक्र' देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.