अहमदाबाद - दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली अनेकांची घरे आणि दुकाने बुलडोझरच्या सहाय्याने हटवली आहेत. त्यावरुन, मोठा वादंग निर्माण झाला असून केंद्र सरकारविरुद्ध विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बुलडोझर चर्चेचा विषय बनला असतानाच आता ब्रिटनच्या पंतप्रधानांनी बुलडोझरवर पोज देत, याकडे लक्ष वेधले आहे. बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट देणारे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत.
जॉन्सन यांचे गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य होते ते हृदय कुंज आणि त्यांच्या अनुयायी मीराबेन यांच्या मीरा कुटीर येथेही त्यांनी भेट दिली. जॉन्सन यांनी चरख्यावर सूत कताईदेखील केली. साबरमती आश्रमातर्फे त्यांना दोन पुस्तके भेट देण्यात आली.
बोरीस जॉन्सन यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुख्य कार्यालयासही भेट दिली. ब्रिटनच्या पहिल्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाल्याचे ते म्हणाले. नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन एनर्जी आणि नवीन ऊर्जा क्षेत्रांवर प्रदीर्घ चर्चा केली. तसेच, संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाची सह-निर्मिती करण्यासाठी युकेतील कंपन्यांसोबतही अदानी ग्रुप काम करेल, असे म्हटले.
या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या सोप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे सौभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बोरिस जॉन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नोदविला.