नागौर - राजस्थानच्या नागौर येथे एका नवजातू शिशुचे नामकरण चक्क 'मिराज' असे करण्यात आले आहे. भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय वायू सेनेकडून मिराज 2000 फायटर जेट विमानांचा वापर करण्यात आला होता. मंगळवार 25 फेब्रवारी रोजी वायू सेनेने हा हल्ला घडवून पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे या जन्मलेल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवण्यात आले आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. मात्र, पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी भारताने मिराज 2000 जेट फायटर या विमानाचा वापर केला होता.
भारतीय सैन्याच्या या मिराज कामगिरीची आठवण म्हणून राजस्थानच्या नागौर येथील एका कुटुंबीयाने आपल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवले आहे. त्यामुळे आता या मुलाचे नाव मिराज सिंग राठोड असे आहे. भारतीय सैन्याने मिराज विमानांच्या सहाय्याने केलेल्या यशस्वी एअर स्ट्राईकमुळे आम्ही मुलाचे मिराज नामकरण केल्याचं मुलाचे वडिल श्रावणसिंग राठोड यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला आशा आहे की, तो भविष्यात नक्कीच सैन्यात भरती होईल, असेही ते म्हणाले. तसेच मिराजचे काका, श्रावणसिंग राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. मला सोमवारी सकाळी सकाळी दोन गुडन्यूज कानी पडल्या. एक म्हणजे भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर केलेला हल्ला आणि दुसरा म्हणजे आमच्या घरात आलेला नवीन पाहुणा. त्यामुळेच आम्ही भारतीय सैन्याच्या विजयाची आठवण म्हणून मुलाचे नाव मिराजसिंग राठोड असे ठेवल्याचं श्रावणसिंग यांनी सांगितलं.