- ऑनलाइन लोकमत
तिरुवन्नमलई, दि. 24 - लग्नाला काही तास उरले असतानाच नव-यामुलावर लग्न मोडल्याचं संकट कोसळलं. अधिका-यांकडून नवरामुलगा एचआयव्हीग्रस्त असल्याचं कळल्याने नवरीमुलीने आणि कुटुंबाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
लग्नाची जोरदार तयार सुरु होती, ठिकठिकाणी बॅनरही लावण्यात आले होते. मात्र बॅनर लावणे मुलाला चांगलेच महागात पडले. बॅनरवरील फोटो पाहून एका व्यक्तीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा महसूल अधिकारी एस पलानी यांना फोन करुन नवरामुलगा एचआयव्हीग्रस्त असल्याची माहिती दिली.
'मला रविवारी रात्री 9.30 वाजता फोन आला होता. फोन करणा-या व्यक्तीने नवरामुलगा एचआयव्हीग्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती दिली. मी तात्काळ पोलीस महानिरीक्षक आणि वैद्यकीय सेवा सहसंचालकांना संपर्क साधून माहिती खरी आहे का याची तपासणी केली. त्यानंतर जिल्हा महसूल अधिका-यांना मुलीच्या घरच्यांना संपर्क साधून माहिती देण्याचे आदेश दिले', असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं आहे.
अधिका-यांनी नव-यामुलाचे सर्व मेडिकल रेकॉर्ड तपासले त्यानुसार ही माहिती खरी होती. 'आम्ही त्याला संपर्क साधला असता त्याने मी स्वत: भेटायला येतो असं सांगितलं होतं. पण तो आला नाही', असं तहसीलदार चेंगम कामराज यांनी सांगितलं आहे. 'त्यादरम्यान अधिका-यांनी मुलीच्या बहिणीचा नंबर मिळवला आणि तिच्याशी संपर्क साधला. पण तिने विश्वास ठेवण्यास नकार दिला. मुलीच्या कुटुंबियांशीदेखील संपर्क साधण्यात आला मात्र नव-यामुलाने त्यांना काही लोक लग्न मोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती दिली होती. त्यानंतर आम्ही लग्नठिकाणी धाव घेतली', असंही चेंगम कामराज यांनी सांगितलं आहे.
अधिका-यांनी मुलीच्या कुटुंबियांना सर्व माहिती दिली तेव्हा अखेर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर मुलीने स्वत: हे लग्न मोडून टाकण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या कुटुंबियांनी सर्व अधिका-यांचे आभारदेखील मानले. आपल्या गावी परत जाण्यासाठी त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान मुलीचं त्याचदिवशी नात्यातील एका व्यक्तीशी लग्न लावण्यात आलं.