देहराडून - निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नेतेमंडळी वाटेल ते करायला तयार असतात. दरम्यान, असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. इथे एका व्यक्तीने निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडून त्याच्या पत्नीला उधार घेतले होते. मात्र ही महिला चेअरमनची निवडणूक जिंकली. तेव्हा तिने तिचा पती आणि मुलांना सोडले आणि पतीच्या मित्रासोबत लग्न केले. या प्रकारामुळे संतापलेल्या या महिलेच्या पहिल्या पतीने आपली पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातच या महिलेचे दुसऱ्या पतीसोबतही वाद झाले असून, तिने आपल्या सध्याच्या पतीने भावासोबत मिळून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मुरादाबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला नेता होण्याची लहर आली. त्याने मुरादाबाद जिल्ह्यातील आरक्षित नगरपंचायत चेअरमनच्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडे त्याची पत्नी उधार देण्याची मागणी केली. त्यावेळी निवडणूक लढण्यासाठी केवळ कागदावर विवाह होणार, असे ठरले. तसेच निवडणुकीनंतर मित्राला त्याची पत्नी परत केली जाईल, असे ठरले.दरम्यान, उधारीवर पतीच्या मित्राची पत्नी बनलेली ही महिला निवडणूक जिंकली. त्यानंतर मात्र मित्राची नियत बदलली. त्याने मित्राला त्याची पत्नी परत करण्याऐवजी तिच्यासोबत विवाह केला. सदर महिलासुद्धा चेअरमन बनून आपल्या पहिल्या पतीला आणि मुलांना सोडून नव्या पतीसोबत राहू लागली.त्यानंतर या महिलेच्या पहिल्या पतीने जसपूरच्या न्यायालयात विनंती पत्र देऊन मित्राकडून आपल्या पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशावर दोन वर्षांपूर्वी कुंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हासुद्धा नोंद झाला. दरम्यान, मागच्या काही काळात या महिलाच्या कुटुंबात तिच्या सवतीची ढवळाढवळ वाढली. त्यामुळे चेअरमन बनलेली ही महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही महिला स्वतंत्र राहू लागली. त्यानंतर या महिलेने आपल्या दुसऱ्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. तसेच मारहाण झाल्याची फिर्याद दिली.