हरीश गुप्ता / नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला परदेशातून प्राप्त हाेणाऱ्या निधीची ‘एनआयए’मार्फत चाैकशी करण्यावरून वातावरण तापले आहे. तर, दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी मवाळ भूमिका घेऊन १९ जानेवारीला हाेणाऱ्या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. केंद्र सरकारला प्रजासत्ताक दिनापूर्वी या आंदाेलनाचा तिढा साेडवायचा असल्याचे ताेमर यांच्या भूमिकेतून दिसत आहे.आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे. हा प्रकार सूडाच्या भावनेतून केल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. आंदाेलनामध्ये मदत करणाऱ्यांना सरकार देशद्राेही ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेपही करण्यात आला आहे.केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची १९ जानेवारीला चर्चा हाेणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत ताेमर यांनी आश्वस्त केले असून, कृषी कायद्यांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे ताेमर यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त इतर पर्यायही मांडावेत, याचा ताेमर यांनी पुनरुच्चार केला. सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचीही पूसा परिसरात पहिली बैठक हाेणार आहे.सोमवारी सर्वोच्च न्यायालय नवी कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून काही हस्तक्षेप केला जाण्याची तसेच ट्रॅक्टर रॅलीच्या मुद्यावरही विचार करण्याची शक्यता आहे, अशी सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची सोमवारी, १९ जानेवरी पहिली बैठक होत आहे. राजपथावर ट्रॅक्टर रॅली काढून प्रजासत्ताक दिनाच्या प्रतिष्ठेतेला बट्टा लागेल, असे शेतकरी बांधवांनी काहीही करू नये, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही केले आहे.सुरक्षाव्यवस्थेत वाढ -- दहशतवादी दिल्लीमध्ये घातपात करू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. - प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला १५ वर्षांहून लहान मुलांनी आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी ओळखपत्रे साेबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास चाैकशी करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले आहे.
शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:24 AM