मेहसाणा : पाटीदार आंदोलनाचे केंद्र असलेले मेहसाणा हे लहानसे शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनगर वडनगरपासून ३५ किमी. दूर आहे आणि दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता खराब आहे. येथून वडनगरला जात असलेल्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. बहुतांश स्थानिक कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेणारे. यंदा ते प्रथमच मतदान करणार आहेत.वडनगरही मेहसाणा जिल्ह्यात येते. वडनगर उन्झा मतदारसंघात येते, तर मेहसाणा वेगळा मतदारसंघ आहे. या १२ लाख नव्या मतदारांसाठी राजकारणाशिवाय अनेक मुद्दे आहेत. या तरुणांमधील आशिष पटेल आणि जसवंत सिंह हे दोघे जवळचे मित्र आहेत, पण त्यांचे राजकीय विचार मात्र एकदम वेगळे आहेत. आशिष हा हार्दिक पटेल यांचा समर्थक आहे, तर जसवंतचा कल भाजपाकडे आहे. आशिष याचे म्हणणे आहे की, पटेल समुदायाचे सर्व लोक श्रीमंत आहेत, असे समजणे चुकीचे आहे. आमच्यापैकी काही जणांकडे नोकरी नाही. पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, एवढी जमीनही नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे.मतदारांमध्ये पटेल १२ टक्के आहेत. त्यात कडवा आणि लेवा या उपजाती आहेत. हार्दिक आणि आशिष कडवा उपजातीचे आहेत. त्यांची संख्या कमी आहे. राज्यातील १८२ पैकी जवळपास ६० जागांवर हे परिणाम करू शकतात. संख्याबळ पाहता लेवा अधिक आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल याच उपजातीच्या आहेत. जसवंत याचे म्हणणे आहे की, पाचव्यांदा भाजपचाच विजय होईल.याच बसमध्ये असलेला एक ओबीसी विद्यार्थी म्हणाला की, वडनगरचे नाते मोदी यांच्याशी आहे. मोदी स्वत: ओबीसी आहेत. अन्य पक्ष येथे तग धरू शकणार नाही. प्रथमच मतदान करणा-या विद्यार्थ्यांसाठी विकास आणि नोकºया हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी २००२ ची दंगल महत्त्वाची नाही. बसमधला हितेश सोळंकी हा विद्यार्थी म्हणाला की, राहुल गांधी यांना एक संधी द्यायला हवी.घराणेशाहीवरून राहुल गांधी यांना लक्ष्य करू नका , भाजपाचे मंत्र्यांना आवाहनघराणेशाहीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष्य करू नका, असे मत गुजरातमधील मत्स्यपालन विभागाचे मंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी व्यक्त केले आहे. चार वेळा आमदार राहिलेले सोळंकी म्हणाले की, २०२२च्या निवडणुकीत मी मुलगा दिव्येश याला लाँच करणार आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी कधी आपल्या पक्षांतर्गत प्रकरणात हस्तक्षेप केला आहे काय? कुणाला तिकीट दिले जावे आणि कुणाला नाही, असे ते म्हणाले आहेत का? मग आपण तरी त्यांच्यावर टीका का करावी?जो ताकदवान आहे, त्याच्या वाटेला भाजपा जात नाही, पण कोणी कमजोर असेल, तर त्याच्याविरुद्ध दादागिरी केली जाते. पुढील निवडणुकीत माझ्या मुलाला तिकीट द्यावे लागेल. भावनगरच्या ९ जागा जिंकायच्या असतील, तर मुलाला तिकीट द्यावे लागेल, अन्यथा मी प्रचारासाठी पुढे येणार नाही.‘दाढी, टोपी’मुळे भाजपा उमेदवाराला नोटीसदभोईमधील भाजपा उमेदवार शैलेश मेहता यांनी एका सभेत, येथे कोणी दाढी, टोपींचे व्यक्ती असतील, तर माफ करा, पण त्यांची संख्या कमी करावी लागेल, असे म्हणाले. दभोईत दुबईची लोकसंख्या असायला नको. आपण निवडून आलो, तर मशीद-मदरशासाठी एक पैसाही देणार नाही. दभोईत मुस्लिमांची लोकसंख्या ३७ टक्के आहे. काही जण मला याबाबत बोलू नका म्हणाले, पण जर ९० टक्के लोक माझ्यासोबत असतील, तर १० टक्के लोकांसाठी मी का गप्प बसू? असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, माझे नाव उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर काही समाजविघातक शक्तींनी बैठक घेतली. त्यांना म्हणे माझी भीती वाटते. अशा समाजविघातक शक्तींमध्ये भीती निर्माण करण्यासाठीच मी येथे आलो आहे, अशीही विधाने त्यांनी केली. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठविली आहे.पूर आला, तेव्हा काँग्रेसचे नेते आराम करत होतेराज्यात पूर आला, तेव्हा भाजपाचे नेते कार्यकर्ते मदतकार्यात गुंतले होते. मात्र, काँग्रेस रिसॉर्ट वर्क (आराम) करत होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले की, बनासकांठामध्ये पुराच्या काळात भाजपा कार्यकर्ते लोकांना मदत करत होते.त्या वेळी काँग्रेसचे आमदार बंगळुरूत आराम करत होते. जे लोक पूरपरिस्थितीत साथ देऊ शकत नाहीत, त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. येथील लोक भाजपा व काँग्रेस यांच्यातील फरक जाणतात.पंतप्रधानांच्या स्थानाचा काँग्रेसला आदरपंतप्रधानांच्या स्थानाचा काँग्रेस आदर करते, असे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी यांचा उल्लेख मणिशंकर अय्यर यांनी ‘नीच’ शब्दांत केल्यानंतर, त्यांना पक्षातून तातडीने काढून टाकण्यात आले. त्याबद्दलचा खुलासा करताना गांधी म्हणाले की, पंतप्रधानांचा अपमान करण्याची काँग्रेसमध्ये कोणालाही परवानगी नाही. मोदीजी आमच्याबद्दल काहीही म्हणू देत. आम्ही तसे वागणे योग्य नाही. सभेत ते म्हणाले की, गुजरातेत काँग्रेस जिंकणार आहे. वादळ येऊ घातले आहे, ते कोणालाच थांबविता येणार नाही.५५ हजार कोटींचे काय झाले?राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली. आदिवासींच्या कल्याणासाठीच्या५५ हजार कोटी रुपयांचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी शुक्रवारी विचारला. गुजरातेत आदिवासींच्या दुरवस्थेबद्दल त्यांनी मोदींना लक्ष्य केले.आदिवासींना स्थलांतराद्वारे मोडून टाकले आहे. वनबंधू योजनेतील ५५ हजार कोटी रुपये कुठे गेले? आदिवासींची जमीन हिसकावली गेली, जंगलांवरील त्यांचे हक्क त्यांना दिले गेलेले नाहीत आणि जमीन मालकीची लक्षावधी कंत्राटे अडवून ठेवली आहेत. तेथे ना शाळा सुरू आहेत ना आदिवासींना रुग्णालय मिळाले, भूमिहिनांना ना घर आहे ना युवकाला रोजगार, अशा शब्दांत गांधी यांनी मोदींवर टिष्ट्वटरवर हल्ला केला.
दोन्ही पक्षांकडून तरुणांना रोजगाराची आशा, विकास व नोक-यांनाच महत्त्व; आरक्षणाबाबत दुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 4:10 AM