ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 10 - प्रेमाचे सूर जुळल्यानंतर प्रियकर-प्रेयसी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. पण काहीवेळा काही कारणांमुळे प्रेमामध्ये दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळता येत नाही. अशावेळी एकाने अचानक लग्नाला नकार दिल्यास तो धक्का दुस-याला सहन होत नाही. प्रेमात आपली फसवणूक झाली किंवा ती कोणा दुस-याची होणार हे दु:ख पचवता न आल्याने माणूस कोलमडून पडतो. त्यातून काहीवेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते.
रायपूरच्या बालोदा बाजारमध्ये दोन युवकांनी अशाच प्रेमविरहाच्या दुखातून गळफास घेऊन जीवन संपवले. अजय कनवर (18) आणि मुरीद साहू (19) अशी या दोन मुलांची नावे आहेत. अजय आणि मुरीदचे ज्या मुलींवर प्रेम होते. त्या मुलींचे रविवारी दुस-या मुलांबरोबर लग्न झाले. ज्या मुलींवर आपण जीवापाड प्रेम केले त्यांनीच आपल्याला दगा दिला अशी या दोन मुलांची भावना झाली होती.
प्रेमात आपली फसवणूक झालीय. आता सर्व काही संपले आहे. आयुष्यात करण्यासारखे आता काही राहिलेले नाही असा टोकाचा विचार त्यांच्या मनात सुरु होता. त्यातूनच त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. दोघांनी आत्महत्येसाठी एकाच रशीचा वापर केला. सोमवारी एका लग्न सोहळयामध्ये या दोघांना शेवटचे एकत्र पाहण्यात आले होते.