ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. १२- उत्तर प्रदेश पोलिसांनी एनआयए ऑफिसर तंजिल यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला आहे. तंजिल यांची हत्या घरगुती भांडण आणि जमिनीच्या वादातून झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी दिली आहे. या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर पोलिसांच्या दाव्यानुसार घरगुती वादातून ही हत्या झाली आहे. तंजिल यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तंजिल यांचा मेहुणा रेहान आणि त्याच्या भाच्याकडून या हत्येचा कट शिजवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हत्येचा मास्टर माइंड असलेला मुनीरलाही लवकरच अटक करू, असं पोलीस इन्स्पेक्टर विजयकुमार मीना यांनी म्हटलं आहे.
तंजिल अहमद हे भाचीच्या लग्नाला जात असताना दिल्लीहून 150 किलोमीटर अंतरावरच्या बिजनोरमधल्या साहसपूर गावात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात तंजिल यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यांच्या मुलांनी या हल्लेखोरांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून घेतली होती. आता या हत्येप्रकरणी रेहान आणि झेनुएल यांना अटक करण्यात आली आहे.