ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - मेसेंजिग अॅप व्हॉट्स अॅपवरुन अश्लील फोटो आणि अश्लील विनोद पाठवले म्हणून दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अटक केलेल्या दोघांपैकी एक ग्रुप अॅडमीन असून, महिला वकिलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली.
सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती नंतर मात्र जामिनावर सुटका केली. मनोज आणि कुलदीप अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोजने अश्लील फोटो किंवा व्हिडीओ अपलोड केले नव्हते पण त्याने कुलदीपला ग्रुपमध्ये अॅड केले होते. महिलेने सांगूनही त्याने कुलदीपला बाहेर काढले नाही म्हणून तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
साकेत पोलिस स्थानकात महिलेने केलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी तिच्या एका नातेवाईकाने तिला व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड केले होते. त्यानंतर आरोपीने महिलेच्या परिचयाचे असणारे काही जण आणि स्वत:चे काही मित्र ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या मोबाईलवर दहाएक मॅसेज आले. यात काही अश्लील फोटो आणि अश्लील विनोद होते. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्यानंतरही अश्लील फोटो टाकणे आणि विनोद सुरु राहिल्याने मी पोलिसात तक्रार दाखल केली असे या महिलेने सांगितले.