नवी दिल्ली : पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात वाँटेड असलेल्या दोघांना सौदी अरेबियात पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना लवकरच भारतात आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.लष्कर ए तोयबाशी संबंध असलेल्या या अतिरेक्यांची नावे अबू सुफियान ऊर्फ असदुल्लाह खान आणि जैनुल अबिदिन ऊर्फ जाहिद शेख अशी आहेत. अबू सुफियान हा हैदराबादचा असून २०११-१२ मध्ये काही अतिरेक्यांसोबत झालेल्या एका बैठकीला तो हजर होता. या अतिरेक्यांना लष्कर ए तोयबाशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून नंतर अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. या प्रकरणातील आरोपी सौदीत लपल्याचा संशय आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुफियानला आठ महिन्यांपूर्वीच पकडण्यात आलेले असून तपास यंत्रणा त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नात आहेत. जैनुल अबिदिन हा इंडियन मुजाहिदीनसाठी स्फोटके पुरविणाऱ्या यंत्रणेत काम करत होता, याचा पर्दाफाश बंगळुरू पोलिसांनीच केला. जैनुल यानेच इंडियन मुजाहिदीनच्या सय्यद अफखाककडे स्फोटके पुरविली होती. पुण्यात २०१० मध्ये झालेल्या या स्फोटात पाच विदेशी व्यक्तींसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी दोघांना सौदीत अटक
By admin | Published: October 10, 2015 2:45 AM