नवी दिल्ली - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी दारूबंदी (Liquor Ban) केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मी त्यांना (उपमुख्यमंत्री) विचारलं, त्यांनी सांगितलं की या परिसरात कुठेतरी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. हे कसं सहन केलं जाऊ शकतं? मी सभापतींसमोर हे सांगतो, जर त्यांनी परवानगी दिली तर मी सर्वांना आजच याचा तपास करण्यास सांगेन" असं म्हटलं आहे. तसेच "मी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना चौकशी करण्यासा सांगेन. येथे बाटल्या येत असतील तर ही काही सामान्य बाब नाही. हे कृत्य करणाऱ्यास सोडलं जाऊ नये. कडक कारवाई करावी" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध"
विधानसभा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही विधानसभेत दारू आणली जाते, त्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. मग बिहारमध्ये काय सुरु असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तेजस्वी म्हणाले आहेत.
"मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा"
हा एक गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिहारभर उघडउघड दारू विकली जात आहे. विधानसभेत सापडत आहे, असा मुद्दा तेजस्वी यांनी विधानसभेत उपस्थित केला, यावर अध्यक्षांनी उद्यापासून सुरक्षा वाढविली जाईल असे सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राजद आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपा आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. एवढी की दोघेही सभागृहात आहे हे विसरले आणि एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.