लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात मोबाइल बाहेर काढण्याची परवानगी नसताना एका वकिलाने चक्क व्हिस्कीच्या बाटल्या सरन्यायाधीशांच्या पुढ्यात ठेवल्या. अर्थात हा एका खटल्याचा भाग होता. एरव्ही रुक्षपणे कामकाज चालणाऱ्या न्यायालयात हलकेफुलके वातावरण झाले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने दाखल याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती.
- कथित ट्रेडमार्क उल्लंघनप्रकरणात अन्य कंपनीविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम जारी करण्याची मागणी करणारा अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर पेर्नोडने त्याविरुद्ध हायकोर्टात दाद मागितली.
- पेर्नोडने दुसऱ्या कंपनीवर आपल्या ट्रेडमार्कच्या वापराचा आरोप केला होता. तथापि, हायकोर्टाने जेके इंटरप्रायजेस व पेर्नोडच्या ट्रेडमार्कमध्ये कोणतेही साधर्म्य नसल्याचे सांगत कनिष्ठ न्यायालयाचा मान्य केला.शुक्रवारी हे प्रकरण सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पेर्नोडचे वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला या बाटल्या दाखविल्या.