मुजफ्फरनगर: पोटचा वारस नालायक निघाल्याने कंटाळून एका वृद्धाने आपली सारी संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे आपल्या पुत्राच्या हातून होऊ नयेत, असेही आपल्या मृत्यूपत्रामध्ये म्हटले आहे. हा वृद्ध उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरचा आहे.
बुढ़ाना गावातील तत्थू सिंह यांनी आपले मृत्यूपत्र केले आहे. त्यांच्या पत्नीचा २० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. नत्थू यांना दोन मुलगे आणि चार मुली आहेत. या सर्वांची लग्ने झालेली आहेत. एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा सहारनपूरयेथे सरकारी शिक्षक आहे. एवढे मोठे कुटुंब असूनही नत्थू सिंह गेल्या पाच महिन्यांपासून वृद्धाश्रमात राहत आहेत. मुलगा आणि सूनेचा आपल्याबरोबरची वागणूक पाहून त्यांनी आपल्या नावची करोडो रुपयांची जमिन राज्यपालांच्या नावे करून टाकली आहे.
आपल्या मुलाच्या वागण्याने त्रस्त नत्थू यांनी कोर्टाच्या जजसमोर देखील मुलाला गोळ्या घातल्या पाहिजेत, असे उद्विग्न होऊन म्हटले होते. नत्थू यांनी थोडी थोडकी नव्हे तर ११.६ एकर जमिन राज्यपालांच्या नावे केली आहे. नत्थू यांनी मुलावर आणि सुनेवर त्यांना मारण्याचे अनेकदा प्रयत्न केल्याचाही आरोप केला आहे. सुनेला मुलीप्रमाणे वागवले होते. तरी देखील ती चुकीचे वागल्य़ाचे त्यांनी म्हटले आहे.