ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २३ - होळी म्हटलं की रंगांची उधळण आली नी पाण्यानं खेळणं आलं. परंतु या खेळाचा आनंद लुटताना नीट काळजी घेतली नाही आणि लहान मुलांकडे लक्ष ठेवलं नाही तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला. रस्त्यावरच्या मुलांना फुगे मारून भिजवताना आपण कुठे आहोत याचं भान राहिलं नाही आणि एक सात आठ वर्षाचा चिमुरडा गॅलरीतून खाली पडला. सुदैवानं त्याचं घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे त्याचा जीव बचावला असून त्याच्या पाठिला व मानेला मार लागला आहे.
अथर्व जिंदाल हा मुलगा राणी बाग परिसरातल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. आपल्या भावांसोबत बाल्कनीमध्ये उभा राहून रस्त्यावरील मुलांना तो फुगे मारत होता. फुगे मारण्यासाठी तो रेलिंगवर चढला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने बाल्कनीमधून खाली पडला. पहिल्या माळ्यावरुन खाली पडल्याने त्याच्या पाठीच्या कण्याला, डोक्याला आणि मानेला जबर मार बसला आहे. उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
अथर्वला नेताजी सुभाष चंद्र परिसरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्याची तब्बेत सध्या स्थिर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांना नेमकी जागा माहित नसल्याने त्यांनी सर्व रुग्णालयात चौकशी सुरु केली. काही तासातच पोलिसांना शोध लागला आणि त्यांनी कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाने यामध्ये कोणी जबाबदार नसल्यांचं म्हणलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.