नवी दिल्ली - PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पब्जीची क्रेझ पाहायला मिळत आहे. तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG खेळण्यासाठी मुलांनी केलेले अनेक कारनामे या आधी समोर आले आहेत. काही जणांनी तर यासाठी टोकाचं पाऊल देखील उचललं आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पब्जीसाठी 12 वर्षांच्या मुलाने नको तो प्रताप केला आहे. मित्रासोबत पब्जी खेळता यावं म्हणूव मुलाने चक्क फेक फोन कॉल करून थेट ट्रेन थांबवली. यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बंगळुरूच्या यलहंका रेल्वे स्टेशनवर 30 मार्चला दुपारी 2 वाजता हेल्पलाईन नंबर 139 वर एक फोन आला. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचं सांगण्यात आलं. फोन कॉलनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. संपूर्ण रेल्वे स्टेशन रिकामं करण्यात आलं. पोलिसांनी सगळीकडे शोधलं. पण त्यांना कुठेच काही सापडलं नाही. यामध्ये तब्बल 90 मिनिटं वाया गेली.
पोलिसांनी अधिक तपास करून हा फोन नेमका कुठून आला होता याची माहिती मिळवली. तो फोन विनायक नगरमधील एका किराणा दुकानातून केला गेला होता. या दुकानदाराने आपल्या 12 वर्षांच्या मुलाला फोन दिला होता आणि त्यानेच हा फोन केला होता. पोलिसांनी मुलाला असा फोन करण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला. मुलगा आपल्या एका मित्रासोबत पब्जी गेम खेळत होता. त्याचा पब्जी प्लेअर मित्र कुटुंबासोबत यलहंका रेल्वे स्टेशनवर काचेगुडा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये होता.
ट्रेन चालू झाली तर त्याला नेटवर्क मिळणार नव्हतं. पण त्याला आणखी खेळायचं होतं. म्हणून त्याने फेक फोन कॉल करून ट्रेन थांबल्याचं पोलिसांना सांगितलं. मुलगा लहान होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही पण त्याला वॉर्निग देऊन सोडून दिलं. तर बॉम्ब शोधकपथकाने 4.45 वाजता क्लिअरंस सर्टिफिकेट दिलं तेव्हा ट्रेन सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.