लखनौ, दि. 26 - योग शिक्षकाची मदत न घेता टीव्ही शोमधील योगासनं पाहत आसनं करणं एका मुलाच्या जिवावर बेतले आहे. योगासनं करत असताना एका 13 वर्षीय मुलाला चादरीचा फास लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गाझियाबादमधील विजयनगर परिसरातील बागू येथील ही घटना आहे. मृत मुलाचे नाव सूरज असे आहे. सूरजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजाला टीव्हीवर योग शो पाहून निरनिराळी आसनं करायची आवड होती, अशा पद्धतीनंच टीव्हीवर योग शो पाहून आसनं करत असताना हा अपघात झाला. दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याची माहिती मिळाली आहे.
विजयनगरमधील बागू येथे राहणारे जोखतलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा नातू सूरजला ( 13 वर्ष ) योगाची आवड होती. ज्यादिवशी ही घटना घडली तो दिवस रविवारीचा होता. यावेळी घरात काही पाहुणेमंडळी आली होती. सर्वांचे जेवण झाल्यानंतर सूरज एका खोलीमध्ये टीव्हीवर योग शो पाहत होता. सतत योग शो पाहत असल्याच्या कारणामुळे यावेळी सूरजला त्याच्या मोठ्या बहीणनं सुनावलेदेखील. पण नेहमीप्रमाणे त्यानं याकडे दुर्लक्ष केले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बराच वेळ झाल्यानंतरही सूरज खोलीतून बाहेर न आल्यानं सर्वजण त्याला पाहण्यासाठी खोलीकडे वळले. यावेळी त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे सर्वांना धक्का बसला. सूरजच्या गळ्याभोवती चादरीचा फास आवळला गेल्याचे आढळले. तर दुसरीकडे टीव्हीवर योग शो सुरू होता. यानंतर तातडीनं त्याला जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
योग शोवरुन ओरडायचे मोठे भांवंडंजोखतलाल यांनी सांगितले की, सूरजला टीव्हीवर योग शो पाहून आसन करायची प्रचंड आवड होती. हातावर उभे राहणे, ऊंची वाढवण्यासाठी लटकणे यांसारखी अनेक आसनं तो करायचा. या नादात त्याला अनेकदा किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. तर दुसरीकडे, याच कारणामुळे त्याचे मोठे भाऊ-बहीण वारंवार त्याला हटकायचे. पण त्यानं नेहमी याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, या घटनेसंदर्भात योग तज्ज्ञांनी सांगितले की, लहान मुलं योगासनं करत असताना त्यांच्यासोबत कुटुंबातील एक व्यक्ती अथवा योग शिक्षकानं असणे आवश्यक असते. अनेकदा लहान मुलं योगासनं करताना चुका करतात, ज्यामुळे असे अपघात घडण्याची शक्यता आहे.