निवारी - मध्य प्रदेशच्या निवारी तालुक्यात एक चिमुकला खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू असतानाच सेनेचीही मदत घेण्यात आली. चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तब्बल 90 तासांनंतर बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेळता खेळता तीन वर्षांचा हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता आहे. प्रल्हाद कुशवाहा असं या तीन वर्षांच्या चिमुकल्याचं नाव होतं. बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज सुरुवातीला येत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती. मुलाला बोअरवेलमधून सुखरुपरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी प्रशासनाच्या सर्व टीम्स वेगाने कार्य करत होत्या.
बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. प्रल्हाद बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तब्बल 90 तास तो बोअरवेलमध्ये होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील चिमुकल्यासाठी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
"ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झाली आहे. लवकरच प्रल्हादला सुखरुप बाहेर काढण्यात येईल, असा मला विश्वास आहे" असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. "ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू" असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं होतं. मात्र आता चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.