हरिद्वार, दि. 16 - योगगुरू रामदेव बाबा यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. भारत-चीनमध्ये डोकलाम मुद्द्यावरून तणाव वाढलेला असताना रामदेव बाबांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. चीनला आर्थिकदृष्ट्या पराभूत करण्याची गरज आहे, त्यासाठी देशभरात नागरिकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणं गरजेचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंजली योगपीठात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 100 फूट उंचावर तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर नागरिकांना संबोधन करताना रामदेव बाबा यांनी चीनला आर्थिकदृष्ट्या पराभूत करण्याची गरज आहे, त्यासाठी देशभरात नागरिकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणं गरजेचं आहे, असं आवाहन केलं.
आक्रमक भाषाच चीनला समजते, त्यामुळे भारताने पहिल्यांदा त्यांना आर्थिकदृष्ट्या पराभव करण्याची गरज आहे. चीनच्या उत्पादनांवर देशातील नागरिकांनी बहिष्कार घालावा आणि 2040 पर्यंत भारताला सुपर पावर बनवण्यात मदत करावी असं ते म्हणाले.
काय आहे डोकलाम प्रकरण-डोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. भारतीय लष्करानं चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखलं आहे. चीनच्या मते तो भूभाग स्वतःच्या मालकीचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील, असाही आहे. सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे. चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, तेव्हापासून दोन्ही देशातील सैन्यामध्ये तणाव वाढत आहे.
आणखी वाचा-
(...जेव्हा रामदेव बाबा फुटबॉल खेळतात !)
(योग संशोधन कार्यासाठी 10,000 कोटी खर्च करणार - रामदेव बाबा)