मुंबई - बहुचर्चित 'छपाक' सिनेमा रिलीज होण्यापूर्वी जेएनयूमधील मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना भेट देऊन कॉन्ट्रव्हर्सीत अडकलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोनला आगामी काळात मोठा फटका बसणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र दीपिकाला या कृतीचा फायदाच झाल्याचे दिसून येत आहे.
दीपिका पदुकोन हिने मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. एवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak अशी मोहीम दीपिकाविरुद्ध राबविण्यात आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या हिसेंचं समर्थन करणाऱ्या लोकांनी दीपिकाला देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केली होती. तसेच लोकांनी तिचा आगामी छपाक सिनेमा पाहू नये, असं आवाहन करण्यात येत होतं.
दीपिका पदुकोनला धडा शिकवण्यासाठी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं आवाहन करण्यात आले होते. अनेक युजर्सने दीपिकाला देशविरोधी म्हणत अनफॉलो केले.
शुक्रवारी दीपिकाचा छपाक सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटात तिने अॅसिड अटॅक पीडितेची भूमिका साकारली आहे. चित्रपटाआधीच झालेल्या या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाला मोठे नुकसान होईल, अशी शक्यता होती. मात्र याउलट घडले आहे. या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाच्या ट्विटरवरील फॉवर्समध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात दीपिकाचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढल्याचे सोशल मीडिया एनालिटीक्स करणाऱ्या Socialblade या वेबसाईटने सांगितले आहे.
दरम्यान जेएनयूमधील भेटीनंतर अनेक युजर्सने दीपिकाला अनफॉलो केले असले तरी तिच्या ट्विटरवरील फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. दीपिकाचे ट्विटरवर आता 27 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.