वॉशिंग्टन - चांद्रयान 2 मोहिमेबाबत भारतासोबत जगातील अन्य देशांनाही तितकीच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रोकडून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अद्याप त्यात यश आलं नाही. विक्रम लँडरबद्दल हॉलिवूड कलाकारांनाही कुतूहल आहे. नासाच्या मुख्यालयातून हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्ठानकातील अंतराळवीर निक हेग यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्याने असंख्य भारतीयांना पडलेला प्रश्न विक्रम लँडरशी संपर्क झाला का? असं निक हेगला विचारलं.
ब्रॅड पिटने निक हेगला अनेक प्रश्न विचारले, अंतराळवीर निक हेगला भारताचा विक्रम लँडर सापडला का? असा प्रश्न केल्यावर निकने अद्याप नाही असं उत्तर दिलं. ब्रॅड पिट सध्या त्याचा आगामी चित्रपट एड एस्ट्रा प्रमोशन करत आहे. त्यासाठी तो नासाच्या मुख्यालयात आला होता. अंतराळात निक हेगसोबत दोन अमेरिकन, दोन रशियन आणि एक इटालियन अंतराळवीर राहत आहेत. ब्रॅड पिटने जवळपास 20 मिनिटे निक हेगशी फोनवरुन संवाद साधला.
भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेवर साऱ्या जगाच्या नजरा होत्या. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखादे यान उतरणार होते. मात्र, पृष्ठभागापासून अवघ्या 2 किमीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या योजनेला काहीसा धक्का बसला आहे. तरीही इस्त्रोच्या लढवय्या शास्त्रज्ञांनी यानाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, मातीमध्ये अँटेना अडकल्याने हे प्रयत्न फोल ठरले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांसाठी काम करण्यासाठी बनविण्यात आले होते. यामुळे इस्त्रो आणि नासाकडे आता केवळ 5 दिवस उरले आहेत.
विक्रम लँडरची माहिती मिळाल्याने इस्त्रोही सर्व प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रमने हार्ड लँडिंग केल्याने त्याच्या काही भाग अपघातग्रस्त झाला आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडलेल्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त नासाच्या ऑर्बिटरने उच्च क्षमतेच्या कॅमेरातून अपोलो 11 उतरलेल्या जागेचे फोटो पाठवले होते.