नवी दिल्ली: भारताला स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठीची पहिली ऑर्डर मिळाली आहे. फिलीपिन्स या देशासोबत भारताचा हा करार झाला असून, फिलीपिन्सच्या संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BAPL) सोबत $374 मिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. विशेष म्हणजे फिलीपिन्स हा अमेरिकेचा मित्र देश असला तरी चीनविरुद्धच्या लष्करी तयारीसाठी त्यांनी भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांवर विश्वास टाकला.
BAPL इंडो-रशियन संयुक्त उपक्रमांतर्गत सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची निर्मिती करते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरुन सोडले जाऊ शकते. भारतीय लष्कराने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि इतर महत्त्वाची शस्त्रे तैनात केली आहे.
BAPL ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची संयुक्त उद्यम कंपनी आहे. हा करार भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रह्मोस निर्यात ऑर्डर या क्षेत्रातील देशासाठी सर्वात मोठी असेल आणि शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताला पुढे नेण्याची मोठी पायरी ठरेल. आता इतर मित्र देशांकडूनही क्षेपणास्त्रासाठी अधिक ऑर्डर अपेक्षित आहे.
फिलिपाइन्सचे सैन्य आणखी मजबूत होईल
या खरेदीमुळे भारताचे फिलीपिन्ससोबतचे संबंध आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. हाँगकाँगमधून प्रकाशित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने तज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, फिलीपिन्सने जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या सैन्याची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून फिलीपिन्स आपल्या किनारी भागाचे रक्षण करू शकणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हक्कावरुन फिलिपाइन्ससोबतचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.