नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला एक नवा कायदा मंजूर झाल्यास तुमचे लाडके सिने कलावंत आणि खेळाडू ज्या वस्तूंची जाहिरात करतात त्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना तुरुंगात जावे लागेल.१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण विधेयक’ नावाचे एक नवे विधेयक केंद्र सरकार तयार करीत असून त्यात निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांच्या व नंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेच्या तरतुदीचा विचार आहे.अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या दुरुस्ती विधेयकाचा मूळ मसुदा तयार केला होता. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये हे विधेयक लोकसभेत मांडले गेल्यावर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठविले गेले होते. समितीने इतर बाबींसोबत निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याची शिफारस केली होती. समितीच्या या शिफारशींसह या विधेयकावर सर्व संबंधितांशी व्यापक सल्लामसलत करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे हे विधेयक मतासाठी पाठविले गेले. या मंत्रीगटात जेटली यांच्याखेरीज रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री राम विलास पासवान आणि कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांचा समावेश होता. आता या मंत्रीगटानेही ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याच्या तरतुदीस अनुकुलता दर्शविली असल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>धोनी, माधुरीचा अनुभवदिल्ली राजधानी परिक्षेत्रात बांधल्या गेलेल्या आम्रपाली गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत क्रिकेटपटू एम. एस. धोनी ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ होता. या वसाहतीमधील घरे कशी आरामदायी व आलिशान आहेत याची तोंडभरून स्तुती करताना जाहिरातीत धोनीला दाखविले गेले होते. प्रत्यक्षात घरे घेतल्यावर अनेक ग्राहकांचा भ्रमनिरास झाल्यावर त्यांनी समाजमाध्यमांवर टिकेची झोड उठविली होती.>बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मॅग्गी नूडल्सची जाहिरात केली होती. शिशाचे प्रमाण मर्यादेहून जास्त असल्याच्या संशयावरून या नूडल्स काही महिने बाजारातून काढून घेतल्यानंतर माधुरीबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
निकृष्ट मालासाठी ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ला तुरुंगवास?
By admin | Published: August 22, 2016 5:33 AM