नवी दिल्ली - देशात बालविवाह (Child Marriage) हा कायद्याने गुन्हा आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता अभियान चालवलं जातं. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. मात्र आजही देशातील अनेक गावांमध्ये मुलीच्या मनाविरुद्ध त्यांचा बालविवाह केला जातो. ही अनिष्ट प्रथा सुरूच आहे. मुलींना देखील कुटंबियांच्या दबाबामुळे कित्येकदा हा विवाह करावा लागतो. मात्र आता मुली हिमतीने बालविवाहाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील एका 15 वर्षाय मुलीने स्वत:च्या लग्नाला ठाम विरोध केला आहे. इतकंच नाही तर जिल्हा बाल कल्याण समितीकडे याबाबत तक्रार देखील केली आहे. सुलेखा कुमारी (Sulekha Kumari) असं या मुलीचं नाव आहे. सुलेखा गुमला जिल्ह्यातील पालाकोट गावातील कस्तुरबा विद्यालयात नववीच्या वर्गात शिकते. तिच्या इच्छेविरुद्ध तिचे आई-वडील आणि नातेवाईकांनी एका 26 वर्षीय तरुणासोबत तिचं लग्न ठरवलं.
फेब्रुवारी महिन्यात सुलेखाचं त्या तरुणाशी लग्न होणार होतं. मात्र सुलेखाला शिकण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळेच तिने सुरुवातीला लग्न करण्यास नकार दिला. तसेच सुलेखानं आपल्या आई-वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. लग्नाला नकार दिल्यास घरातील मंडळींनी तिला मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर सुलेखानेो घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
सुलेखाने पालकोटच्या BDO अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार केली. अधिकाऱ्यांनी सुलेखाला बाल कल्याण समितीकडे पाठवलं. या समितीच्या अधिकाऱ्यांनी सुलेखाला संरक्षण तर दिलंच त्याचबरोबर तिच्या पुढील शिक्षणाची देखील सोय केली आहे. सुलेखाच्या या साहसाची सध्या संपूर्ण गुमला जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक अल्पवयीन मुलीने आपला विवाह रोखण्यासाठी या प्रकारचं धाडस दाखवण्याची गरज आहे जेणेकरून त्या भविष्यात उत्तम यश संपादन करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.