नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. देहरादूनमधील 'इंडियन मिलिटरी अकादमीची पासिंग आउट परेड अलीकडेच पार पडली. पासिंग आउट परेडमध्ये 377 जणांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांचे आई-वडील आणि कुटुंबाचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. पासिंग आउट परेडनंतर 288 युवा सैन्य अधिकारी मिळाले आहेत. याच दरम्यान जम्मूच्या बाबा दानिश लैंगरची प्रेरणादायी कहाणी आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा दानिशला 2017 साली लकवा मारला होता. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने दानिश ग्रासला होता. दानिशचं लहाणपणापासून सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होतं. मात्र, या आजारामुळे ते स्वप्न पूर्ण करता येणार नाही याची भीती जाणवू लागली. मात्र, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने या आजारावर मात केली. दानिशने आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू केला. दानिशचे वडील मृदा संरक्षण विभागात अधिकारी आहेत.
दानिशला लकवा मारल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी फिजिओथेरपी सुरू केली. सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दानिशने व्यायामाला सुरुवात केली आणि सहा महिन्यातच त्याने त्याच्या आजारावर मात केली. माझ्या मुलावर अनेक संकटे आली. वाईट वेळही आली. पण त्याने सर्व संकटांवर मात करुन आपलं ध्येय पूर्ण केलं. आज मला त्याचा अभिमान आहे. सैन्य अधिकाऱ्याचा वडील असण्याचा मला खूप अभिमान आहे, असं दानिशचे वडील राजेश लैंगर यांनी म्हटलं आहे.
जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. ज्याचा शरिरातील मज्जासंस्थेवर परिणाम होतो. या आजारामुळे एखादी व्यक्ती वर्षभर अंथरुणाला खिळू शकते. प्लाझ्मामुळे हा आजार बरा होऊ शकतो. दानिश लैंगर यांच्या वर्गमित्रांनी त्याचे कौतुक केलं आहे. दानिशच्या ध्यैर्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगात अनेकांनी हार मानली. पण दानिशने त्याचे स्वप्न पूर्ण केलं. आम्ही सर्व त्याच्यासाठी खूप खूश आहोत असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.