लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. काही वेळा छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होतात. ते टोकाला जातात आणि लग्न मोडतं. लग्नात मारहाण झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच. पण लग्नात पापडासाठी तुफान राडा झाल्याचं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. केरळमधील अलप्पुझा येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पापडावरून झालेल्या भांडणात सहा जण जखमीही झाले आहेत. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे 'पापड' मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला यानंतर ही हाणामारी सुरू झाली.
दोन्ही पक्षातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चपलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला. अलप्पुझा येथील मुत्तोम येथील एका विवाह मंडपात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वराच्या काही मित्रांनी आणखी पापड मागितले होते, जे देण्यास केटरिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. यावरुनच हे भांडण सुरू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुरुवातीला त्यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर याचं हाणामारीत रूपांतर झालं. या घटनेची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.