नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीनने तयार केलेल्या सायनो व्हॅक लशीच्या नुकत्याच आलेल्या परीक्षणाच्या निकालाने संपूर्ण ब्राझीलला भयभीत केले आहे. चीनने मोठ्या आशेने ही लस पाठवली होती. मात्र, ती कोरोनाविरोधात केवळ 50 टक्केच यशस्वी ठरली. चिनी लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाच्या या निकालानंतर ब्राझील सरकारने भारतीय लशीकडे आपले लक्ष वळवले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्राझीलने मंगळवारी कोव्हॅक्सीन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कम्पनीसोबत करार केला आहे. याशिवाय ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनकाच्या लशीसाठीही पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटसोबत करार केला आहे.
भारत बायोटेकचे वरिष्ठ अधिकारी मुरली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की ब्राझील सरकारच्या हेल्थ रेग्युलेटर अन्विसाने थेट कंपनीकडून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला थेट लशीचा सप्लाय करण्याबरोबरच कंपनीने ब्राझीलमधील प्रेसिसा मेडिकामेंटोस कम्पनीसोबतही 12 जानेवारीला करार केला आहे. ब्राझील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, खासगी कम्पनीच्या मार्गाने होणाऱ्या खरेदीला स्वतंत्र्यपणे मंजुरी दिली जाईल. सध्या येणाऱ्या काळात ब्राझीलला जवळपास 1.2 कोटी डोस पुरवणे हे भारत बायोटेकचे लक्ष्य आहे.
यापूर्वी, ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसेनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून कोविशील्ड लशीचे 20 लाख डोस पुरविण्याची विनंती केली आहे. बोलसेनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारतीय लसीकरण प्रभावित न होऊ देता ब्राझीलला इमर्जन्सी स्थितीत लशींचा पुरवठा करण्याचा आग्रह केला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असतानाच, ब्राझीलने चीनच्या सायनो व्हॅक फार्माला आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी दिली होती. याअंतर्गत अनेकांना लसही टोचण्यात आली होती. ब्राझीलमधील साऊ पाऊलो येथील बुन्तान इन्स्टिट्यूटने चिनी कम्पनी सायनो व्हॅक फार्मासोबत तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आणि उत्पादनासाठी करारही केला होता. यावेळी सुरुवातीच्या परीक्षणानंतर ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, आता आलेल्या परिणामांनी हा दावा चुकीचा ठरवला आहे.
चिनी लस केवळ 50.38 टक्केच प्रभावी -ब्राझीलच्या माध्यमांत बुन्तान इंस्टिट्यूटमध्ये क्लिनिकल रिसर्चचे मेडिकल डायरेक्टर रिकार्डो पलासियो यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ही चिनी लस केवळ 50.38 टक्केच प्रभावी असल्याचे समोर आले आहे. यात कोरोनाचे किरकोळ लक्षणे असलेल्या लोकांचाही समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, ब्राझीलच्या आरोग्य नियामक अन्विसाने गेल्या आठवड्यात चिनी कोरोना व्हॅक लशीसंदर्भात बुन्तान इंस्टिट्यूटने दाखल लेल्या इमर्जन्सी वापरासंदर्भातील अर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्विसाच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या अर्जात काही महत्वाची माहिती देण्यात आलेली नाही. यात लोकांचे वय, लिंग, तसेच आधीपासूनच त्यांना असलेल्या आरोग्य विषयक समस्यांवर माहिती देण्यात आलेली नाही.