नवी दिल्ली : बेकरीमध्ये तयार केला जाणारा ब्रेड अधिक लुसलुशीत व्हावा व त्याला मनमोहक तजेला यावा यासाठी त्याच्या पिठात मिसळल्या जाणाऱ्या ‘पोटॅशियम ब्रोमेट’ या रासायनिक संयुगाचा वापर यापुढे स्वत:हून बंद करण्याचा निर्णय ‘आॅल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने गुरुवारी जाहीर केला.राजधानी दिल्लीच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या ३८ विविध प्रकारच्या ब्रेडपैकी ८५ टक्के ब्रेडच्या नमुन्यांमध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’ आणि ‘पोटॅशियम आयोडेट’ हे दोन संभाव्य हानिकारक घटक आढळून आल्याचा अहवाल ‘सेटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने (सीएसई) जाहीर केला. त्यानंतर ‘फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅडर्ड्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (एफएसएसएआय) या रासायनिक घटकाचा अन्नपदार्थांमध्ये वापर करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयास केली. ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे मानवामध्ये कर्करोग होण्याचे संभाव्य कारण ठरू शकते, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच काढला आहे. अखिल भारतीय ब्रेड उत्पादक संघाने (एआयबीएमए) येथे पत्रपरिषदेत पोटॅशियम ब्रोमेटचा वापर थांबविणार असल्याची घोषणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारतात या घटकावर बंदी नाही. भारतात पुरविण्यात येत असलेले ब्रेडही सुरक्षित आहेत, मात्र लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे हार्वेस्ट गोल्ड या ब्रेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदिल हसन यांनी स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व बड्या कंपन्या उपरोक्त घटकांऐवजी पर्यायी रसायनांचा वापर सुरू करतील.सीएसईवर संगनमताचा आरोप...सीएसईने अहवाल थेट प्रसिद्धिमाध्यमांसमोर ठेवल्याबद्दल हसन यांनी जोरदार टीका केली. या संस्थेने अन्न नियामकाकडे जात पोटॅशियम ब्रोमेटचा वापर कमी करण्याबाबत किंवा त्यावर बंदी आणण्याची शिफारस करायला हवी होती, असे ते म्हणाले. सीएसई आणि एन्झाईम तयार करणाऱ्या कंपन्यांच्या संगनमतातून हा अहवाल समोर आणला गेला आहे. त्यामागे निश्चितच काही लोकांचे हितस्वारस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेत पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर बंदी नाही. भारतातील अन्न नियामकानेही त्याला परवानगी दिल्यामुळे हा घटक सुरक्षित असल्याचे सिद्ध होते, असेही ते म्हणाले.ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेटला पर्याय म्हणून उत्प्रेरकांचा (एन्झाईम) अथवा इमल्सीफायरचा वापर केला जाऊ शकतो. ही रसायने पोटॅशियम ब्रोमेटपेक्षा स्वस्त असली तरी त्यांचा वापर करताना दक्षता घेणे आवश्यक ठरते.
पोटॅशियम ब्रोमेटविना तयार करणार ब्रेड
By admin | Published: May 27, 2016 4:33 AM