मुंबई: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाक्षणिक उपोषण करत आहेत. यादरम्यान ते चेन्नईतील डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटन सोहळ्यासह अन्य काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील मोदींच्या या एकदिवसीय दौऱ्याची कार्यक्रमपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रम पत्रिकेत नमूद केल्यानुसार पंतप्रधान मोदी विमानात न्याहरी आणि दुपारचे जेवण घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसप्रमाणे मोदींनीही लाक्षणिक उपोषण गुंडाळले का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी विमानाने दिल्लीतून उड्डाण केल्यानंतर ते 9 वाजून 20 मिनिटांनी चेन्नई विमातळावर पोहोचेल. यादरम्यान मोदी विमानातच नाश्ता करतील. तर दुपारचे जेवणही मोदी विमानातच करतील, असे कार्यक्रम पत्रिकेत स्पष्टपणे दिसत आहे. या कार्यक्रम पत्रिकेमुळे आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.भाजपाचे सर्व खासदार गुरुवारी 12 एप्रिल रोजी एक दिवसाचे उपोषण करतील, असेही मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले होते. भाजपाच्या वाढत्या ताकदीने पोटदुखी झालेली काँग्रेस देशाचे हित बाजूला ठेवून मुद्दाम फुटपाडू आणि नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप करून, मोदी यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना व मंत्र्यांना गावोगाव जाऊन सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती देण्यासही सांगितले होते. भाजपाच्या या खेळीला नैतिक काटशह देण्यासाठी काँग्रेसने देशात सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा, यासाठी भाजपाच्या आधीच 9 एप्रिल रोजी देशव्यापी उपोषण आयोजित केले होते.
#HungerStrike: मोदींनी विमानातच केली न्याहरी, उपोषण आटोपले सकाळच्याच प्रहरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 3:40 PM