नवी दिल्ली/मुंबई - या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नुकत्याच पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाने मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच भाजपाचे महाराष्ट्रामधील राज्यसभेचे उमेदवारही निश्चित झाले आहे. सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना भाजपाने महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआय (ए) चे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि आरपीआय आठवले गटाचे रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेले संजय काकडे आणि अमर साबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
भाजपाने महाराष्ट्राबरोबरच राज्यसभेच्या इतर राज्यातील उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांमध्ये आसाममधून भुवनेश्वर कालिता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमिलाबेन बारा, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, राजस्थानमधून राजेंद्र गहलोत यांचा समावेश आहे. त्याबरोबरच आसाममधून मित्रपक्ष बीपीएच्या बुस्वजित डाइमरी यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.