Congress Candidates List ( Marathi News ) : भाजपनंतर आता काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तिरुअनंतपुरममधून शशी थरूर आणि बंगळुरू ग्रामीणमधून डी. के. सुरेश यांना संधी देण्यात
आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाकडून उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या ३९ उमेदवारांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार असून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जागावाटपावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत काँग्रेसकडूनही महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट आहे.