दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया Manish Sisodia यांची सुमारे ८ तास चौकशी केली होती. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले होते. दरम्यान, यानंतर मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि तुरुंगात असलेल्या Satyendar Jain सत्येंद्र जैन यांनी आपला राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा मजूर केला आहे.
सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण ८ विभाग होते. त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल ९ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
तत्पूर्वी, न्यायालयाने मंगळवारी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिला. सिसोदिया सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. "आम्ही सध्याच्या परिस्थितीत कलम ३२ अंतर्गत याचिका विचारात घेण्यास इच्छुक नाही," असं मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या याचिकेवर म्हटल.