गेल्या दोन दिवसांपासून आपल्या भाषणातून पुरते घायाळ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणखी एक वार केला आहे. मोदी सरकारने लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली आहे. काँग्रेस म्हणजेच युपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात ही श्वेतपत्रिका आणण्यात आली आहे.
यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सीतारामन यांनी अशी श्वेतपत्रिका आणणार असल्याचे म्हटले होते. एनडीए सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका सादर केली.
या श्वेतपत्रिकेत यूपीए दशक आणि एनडीए दशकाचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या होत्या. यूपीए राजवटीतील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि एनडीए राजवटीतील आर्थिक व्यवस्थापन यामध्ये मांडण्यात आले आहे.या श्वेतपत्रिकेत काय...या श्वेतपत्रिकेमध्ये युपीए सरकारचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यूपीए सरकारने देशाचा आर्थिक पाया कमकुवत केल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यूपीएच्या काळात रुपयाची मोठी घसरण झाली होती. बँकिंग क्षेत्र संकटात होते, परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली होती, मोठे कर्ज घेतले होते तसेच महसुलाचा गैरवापर झाला होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे.