ब्रेकिंग: राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी घडामोड; काँग्रेसचे अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 10:46 AM2019-11-06T10:46:41+5:302019-11-06T10:59:11+5:30
शिवसेनेकडून दररोज भाजपवर दबाव आणण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडूनदेखील विविध वक्तव्ये समोर आली.
दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेबाबत पेच वाढत चालला असून अनेक वेगवान घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे अहमद पटेल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यात निवासस्थानी जवळपास अर्धा तास भेट झाली. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. तर नितीन गडकरी महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेवर चर्चा झाली होती. राज्यात शिवसेना-भाजपा महायुतीला बहुमत मिळालं असतानाही या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १४ दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.
दुसरीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचं नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करु शकतात अशी चर्चा आहे. त्यात काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे. शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे पण काँग्रेसने अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे अहमद पटेल यांनी नितीन गडकरींची भेट घेतल्याने या सर्व घडामोडीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासंदर्भात कठोर भूमिका घेतली असल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापन करण्यासंदर्भात कोंडी निर्माण झाली आहे. राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. शिवसेनेची भूमिका, सत्तास्थापनेतील अडथळे, भविष्यातील अडथळे यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली.
शिवसेनेकडून दररोज भाजपवर दबाव आणण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडूनदेखील विविध वक्तव्ये समोर आली. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या गोटातही राजकीय हालचालींना सोमवारपासून वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानीदेखील चर्चा झाली. मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री असावा असाच निर्णय झाला.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर नाही तर शेतकरी विषयावर भेटलो
या भेटीनंतर काँग्रेसचे अहमद पटेल यांनी माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटलो असल्याची माहिती त्यांनी दिली.
Delhi: Senior Congress leader Ahmed Patel leaves after meeting Union Minister Nitin Gadkari; says, "I met him over farmer issues. It was not a political meeting or on Maharashtra politics." pic.twitter.com/zJ6IRj2sj5
— ANI (@ANI) November 6, 2019
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री शिवसेनेचाच; प्रस्ताव आला नाही अन् पाठवणारही नाही - राऊत
फडणवीस-ठाकरेंच्या मध्यस्थीसाठी खास व्यक्ती लागली कामाला; आता तरी ठरणार का सत्ता वाटपाचा फॉर्म्युला?
जर कुणीच मागे हटायला नाही तयार; मग कसं बनणार महायुतीचं सरकार?
मुख्यमंत्रिपद भाजपकडेच,शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे; सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार
दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध