इंडिया आघाडीमध्ये मोठा धमाका! तृणमूल काँग्रेस एकट्याने लोकसभा लढणार, ममता बॅनर्जींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:25 PM2024-01-24T12:25:48+5:302024-01-24T12:27:20+5:30
Mamata Banerjee Latest News: ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे.
भाजपाविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक राज्यात एकट्याने लढणार असल्याचे ममता यांनी जाहीर केले आहे. आपण दिलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचे ममता यांनी म्हटले आहे.
विरोधकांची मोट बांधून मोदींना टक्कर देण्याची योजना नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी आखली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमारांचेच तळ्यात मळ्यात सुरु झाले आहे. तर काँग्रेसला मित्रपक्षांच्याही जागा हव्या आहेत. यामुळे सारा पेच फसला असून लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांवर आलेली असली तरी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने आता प्रादेशिक पक्षांनी आपापली वेगळी वाट धरण्याचा विचार सुरु केला आहे.
यात ममता यांनी आघाडी घेतली असून तृणमुल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये एकट्याच्या ताकदीवर लढणार असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी बसपा एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांनी सपावर गंभीर आरोप केले होते.
माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये , आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने ३०० जागांवर निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भागात भाजपशी स्पर्धा करू द्यावी, असे आम्ही आधीच सांगितले होते, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. जेणेकरून प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील, पण त्यांनी हस्तक्षेप केल्यास आघाडीचा पुन्हा विचार करावा लागेल, असेही ममता म्हणाल्या.