वलसाड : मुंबईहून निघालेल्या रेल्वे गाडीला गुजरातमधील वलसाड येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वलसाडमध्ये 'हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेस' ट्रेनला आग लागली अन् एकच खळबळ माजली. ही गाडी मुंबईहून अहमदाबादला जात होती. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात यश आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. वलसाडमधून जात असताना तिरुच्छिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शन या ट्रेन क्रमांक २२४९८ च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर दिसून आला. शेजारील डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर उतरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. आग लागलेला डबा वेगळा केल्यानंतर गाडी पुढे सोडण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
वलसाडच्या अलीकडे घडली दुर्घटना हमसफर एक्स्प्रेसच्या जनरेटर कोचला आग लागल्याची घटना गाडी वलसाड रेल्वे स्थानकावरून सुरतकडे निघाली असतानाच घडली. जेव्हा ट्रेन वलसाड जिल्ह्यातील छिपवाडमध्ये पोहोचली तेव्हा जनरेटर कोचमध्ये अचानक आग लागली, जी वेगाने मागील पॅसेंजरच्या डब्यात पसरली. त्यामुळे रेल्वेत एकच गोंधळ उडाला. ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि जळणारे डबे उर्वरित ट्रेनपासून वेगळे करण्यात आले.
गुजरातमध्ये ट्रेनला आग लागण्याची दुसरी घटनागुजरातमध्ये ट्रेनला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वी दाहोद आनंद मेमू ट्रेन क्रमांक ९३५० च्या इंजिनला भीषण आग लागली होती. दाहोदपासून दहा किमी अंतरावर असलेल्या जेकोट रेल्वे स्थानकावर गोध्रा जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना उतरवताना लागलेली आग लगेचच दोन डब्यांमध्ये पसरली. परंतु सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. जळत्या ट्रेनची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली होती.